शापित अप्सरा; जी महाराणी बनू शकली असती..
रोमन मायथॉलॉजी मध्ये ममत्व आणि सौंदर्याची देवी म्हणून डायनाची ओळख आहे. देवांच्या अधिपती ज्यूपिटरची अतिशय सुंदर, निरागस आणि सालस मुलगी, प्रकाशाचा देव अपोलोची बहीण, वनांमध्ये रमणाऱ्या, चंद्रासारख्या शीतल असलेल्या डायनाचं अरण्यात आलेल्या एका शिकाऱ्यावर प्रेम जडतं. दोघांमध्ये प्रेम संबंध दृढ होतात. पण डायनाच्या भावाला अपोलोला हे मान्य नसतं. तो कारस्थान करून डायनाकरवी तिच्या त्या प्रियकराचा खून करवतो. त्या मागचं कारण एकच असतं; डायना कायमस्वरूपी अविवाहीत; कुमारिका राहावी, प्युअर असावी, व्हर्जीन म्हणून ओळखली जावी आणि तसं होतं देखील; आजही रोमन मायथॉलॉजी मध्ये प्युरिटी आणि व्हर्जिनिटी साठी डायनाला प्रमाण आणि साक्ष मानलं जातं.
हीच व्हर्जिनिटी, प्युरिटी तिच्याच सारख्या एका दुसऱ्या डायनासाठी मात्र अभिशाप बनली. त्या व्यक्तीला संपूर्ण दुनिया आज "प्रिन्सेस ऑफ व्हेल डायना" म्हणून ओळखतं.
आपल्यातल्या खूप कमी जणांना माहीत असेल अमेरिकन मुलाखतकार Oprah Gail Winfrey च्या मुलाखती ह्या जगात सर्वात महत्वाच्या आणि अभ्यासू मुलाखती म्हणून ओळखल्या जातात. जगभरातल्या मोठमोठया हस्ती इथे आपलं मन मोकळं करतात. मध्यंतरीच्या काळात oprah ने प्रिन्सेस डायनाच्या मुलाची प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघनची घेतलेली मुलाखत खूप साऱ्या गोष्टी उघड करते.
२४ फेब्रुवारी १९८१ ला ब्रिटिश सरकारने ‘प्रिन्स चार्ल्स’ आणि एक आउटसायडर ‘डायना फ्रांसिस स्पेन्सर’ नावाच्या मुलीच्या ऑफिशिअल एंगेजमेंटची घोषणा केली. डझनवारी प्रेम प्रकरणं असलेल्या ३२ वर्षीय प्रिन्स चार्ल्सने आपली पत्नी आणि ब्रिटनची भावी महाराणी बनण्यासाठी आपल्यापेक्षा चौदा वर्षांनी लहान असलेल्या १८ वर्षीय डायनाची निवड केली. राजघराण्याने मान्यताही दिली ते तिच्या कौमार्याची परीक्षा घेऊन; राजघराण्यात त्या गोष्टीला "बॅल्मोरल टेस्ट" म्हणत. डायनाला लग्नाआधी प्रिन्स चार्ल्सच्या सगळ्या प्रेम प्रकारणांबद्दल माहीत होतं. पण दुर्दैव असं की जगातला कुठलाही कोपरा असो, मग तो भारतासारख्या प्रगतशील देशाचा साधारण मध्यमवर्ग असो किंवा Monarchy जपणाऱ्या अतिश्रीमंत ब्रिटन राष्ट्राचं शाही कुटुंब; आंधळा विश्वास आणि भविष्यातल्या सुखाची उमेद एखाद्याच्या आयुष्याची अशी धूळधाण करून ठेवतं कि ती झालेली हानी ना भविष्यकाळ भरून काढत ना पुढे आयुष्यभर ढाळलेले अश्रू. जी गत आपल्या इथे छपरी पोरांच्या गळ्यात आंधळेपणाने माळ घालणाऱ्या चांगल्या घरातल्या मुलींची होते तीच गत डायनाची झाली. २४ जुलै १९८१ ला प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना पती पत्नी झाले.
प्रिन्स चार्ल्सने पुढल्या दीड दोन वर्षात राजघराण्याला अपेक्षित दोन राजकुमार दिले. राजगादीचे वारस घेऊन तिच्याशी लग्नाचं प्रयोजन शाही घराण्याने पूर्ण केलं. पण मुलं झाली म्हणजे नवरा बायकोमध्ये प्रेम आहे असा अर्थ होत नाही. प्रिन्स चार्ल्सची पूर्वीची प्रेमिका ‘केमीला पार्कर बाउल’ पुन्हा त्याच्या आयुष्यात आली होती. एकीकडे राजघराण्याच्या प्रिन्सेस डायना कडून असलेल्या डोंगराएवढ्या अपेक्षा आणि दुसरीकडे नवऱ्याची पुन्हा उजेडात येणारी प्रेम प्रकरणं ह्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. राजघराण्याकडून डायनाला आऊटकास्ट केलं गेलं. ती आपल्या इथल्या टीव्ही मालिकांमधली 'राधिका, अरुंधती' सारखी नायिका नव्हती, ती खरं आयुष्य जगणारी 'डायना' होती; कदाचित हाच मोठा फरक आहे कल्पनाविस्तार आणि शाश्वत आयुष्यामधला. डायनामध्ये प्रॉब्लेम आहेत. तिचा मेंटल हेल्थचा इश्यू आहे असं परिपत्रक जाहीर करत राजघराण्याने डायनाशी सगळे संबंध तोडून टाकले. १९९६ला हे शाही लग्न संपुष्टात आलं त्याची मोठी किंमत प्रिन्स चार्ल्सलाही मोजावी लागली आणि प्रिन्सेस डायनालाही. चार्ल्स कधीच गादीवर बसू शकले नाहीत आणि ३१ ऑगस्ट १९९७ ला प्रिन्सेस डायना ह्या जगाचा निरोप घेत निघून गेली. तिचं जाणं हे देखील जगातल्या काही न उलगडलेल्या रहस्यांपैकी एक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा प्रिन्स हॅरी आणि त्याच्या पत्नीने मेघनने त्या मुलाखती दरम्यान केला आहे.
Oprah Interview आणि The Crown Season 4 मुळे ह्या जाणिवा पुन्हा जाग्या झाल्या.
प्राचीन ग्रीक तत्वज्ञ आणि सिकंदरचे गुरु ऍरिस्टोटल ह्यांनी Beauty Of Tragedy चा सिद्धांत मांडला होता; "काही काही दु:खांत एवढे विलोभनीय असतात की ते मनाला कितीही चटका लावून जाणारे असले तरी त्या गोष्टींचं चिरसौंदर्य त्याच नाशवंतपणात दडलेलं असतं.". आयुष्य किती क्षणभंगुर आहे हे सांगायला आपल्याला कुणा तत्ववेत्त्याची गरज नाही; ह्या कोरोना काळात अगदी जवळून आपण आजमावलंय हे. पण कल्पना विलासाएवढं सुख नाही; प्रिन्सेस डायना प्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीतही दैदिप्यमान नवा इतिहास रचला गेला असता जर गुरुदत्त एवढया लवकर हे जग सोडून गेले नसते, स्मिता पाटील अजून आपल्यात असत्या तर किती छान वाटलं असतं, दिव्या भारती जर आज असती तर तिच्या निरागस आणि मनाला वेड लावणाऱ्या गोड चेहऱ्यावर आज वयोमानाच्या छटा नक्की कशा दिसल्या असत्या?, सुशांत सिंगचं जाणं जर बदलता आलं असतं तर काय झालं असतं आणि प्रिन्सेस डायना सारखी स्वर्गीय सौंदर्य असलेली ब्रिटनची महाराणी आज ब्रिटनच्या राजगादीवर किती शोभून दिसली असती.
ह्यासारख्या जर तरच्या प्रश्नांना शेवट नसतो हेच खरं.शेवट असतो तो ह्या गंधर्वांना आणि अप्सरांना. त्यांचं येणं एक कोडं असतं आणि जाणं एक रहस्य. ह्या सगळ्यांच्या इतिहासाकडे आपण नीट पाहिलं तर ह्यांच्या आयुष्यात एकच चूक प्रकर्षाने घडलेली दिसते ती म्हणजे त्यांची निवड चुकली. असो!!.. कदाचित तेच निमित्तमात्र ठरलं असेल. ते जोवर असतात तोवर आनंद, हास्य आणि प्रेरणा देऊन जातात. आपल्या सारख्या नाशवंतांनी ते जेवढं अभ्यासता यावं तेवढं अभ्यासावं कदाचित हाती कथानकांसाठी काही निराळे धागे सापडतील.
✍️अजिंक्य ठाकूर

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment