तू सांब भोळा; उमा पार्वती मी..


कायम हिमाच्छादीतच प्रदेश तो; त्यामुळे अंग गोठवून टाकणारी थंडी सदोदीत पडलेली असायची; पण आज हवेत खूपच गारवा जाणवत होता. हिमनगाच्या सर्वात उंच शिखरावर आपल्या नेहमीच्या शिळेवर खोल दरीच्या दिशेने पहात महादेव निवांत बसले होते. नेहमी प्रमाणेच शांत, धीर गंभीर मुद्रा, भस्मामुळे कापरासारखं चमकत असलेलं अंग, पाठीवर लांब पसरलेल्या जटा, आणि गळ्यातून खांद्यावर रुळणारा वासुकी. पण नेहमीची योगशांतता चेहऱ्यावर दिसत नव्हती. काहीसा थकलेला होता चेहरा. गहन विचारात असावेत. लांब एका टेकडीवर शेकोटीचा धूर आणि मुंगी एवढे काही गण नाचगाणी करताना दिसत होते. संबळ, नगारे ह्यांचा पुसटसा ध्वनी येत होता. कैलासावर दूरवर पर्यंत पथ दिव्यांची रोषणाई दिसत होती. खूप वर्षांनंतर कैलासावर लग्नसोहळा घडला होता. सगळे गण त्याच आनंदात फेर धरून नाचत होते. त्यांना पाहून महादेवांच्या चेहऱ्यावर पुसटसं समाधानाचं स्मित झळकलं. त्यांच्यावरची नजर काढून त्यांनी आकाशातल्या चंद्रावर स्थिरावली. सप्तमीचा चंद्र आकाशात सुस्तावला होता. त्या चंद्राच्या शीतल प्रकाशात आधीच शुभ्र असलेला हा कैलास अजूनच स्फटिका सारखा चमकत होता.


तेवढ्यात पैंजणाचा ओळखीचा आवाज कानाशी हळूच किणकीणला. महादेवांची नजर चंद्रावर स्थीर होती. पायावर चंदनाची दोन बोटं हलकेच उमटली, चाफ्याचं फूल आणि एक बिल्वदल ठेवलं गेलं. महादेवांनी चंद्रावरची नजर काढून समोर कटाक्ष टाकला तर निळसर आकाशी रंगाची साडी नेसून पार्वती आपल्या नित्यपूजेसाठी तिथे आली होती. जगदंबा आईचं आरासपाणि सौंदर्य ते; वर्णन करायला शब्द थिटे पडतील. पार्वतीला पाहून महादेवांच्या चेहऱ्यावर मधूर स्मित हास्य झळकलं. पार्वतीची पूजा संपताच ती निघणार तेवढ्यात महादेवांनी तिला आपल्या सोबत बसण्याचा इशारा केला. तिथेच पुजेचं ताम्हण ठेवून ती त्यांच्याजवळ शिळेवर बसली. तिलाही त्यांचा नूर आज काही औरच वाटला. धड ध्यान ही नाही, धड संवाद ही नाही. काही वेळ तसाच निघून गेला. पार्वतीची थोडी चुळबूळ वाढली; तिला ही शांतता काही स्थीर बसू देईना. शेवटी न राहवून तिने प्रश्न केलाच; "विनायकाचा विवाह छान..". तिचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच समोरून प्रश्न आला, "पार्वती; तू सुखी आहेस ना?..". पार्वतीसाठी प्रश्न अत्यंत अनपेक्षित होता. वेळ, व्यक्ती, संदर्भ आणि हा प्रश्न कशाचाच कशाशी मेळ बसेना. पार्वतीने क्षणभर वेळ घेतला; उत्तराच्या अपेक्षेने महादेव तिच्याकडेच एकटक पाहत आहेत हे तिने पाहिलं. पार्वतीने तेवढ्याच शांतपणे त्यांना उत्तर दिलं; "आज विवाह आपल्या मुलाचा झालाय; आपला नाही..." महादेवांनी तेवढ्याच शांतपणे तिला म्हणाले; "माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाहीये." पार्वती मंदस्मित करत हसली, म्हणाली; "आपल्याला विवाहाला एवढी संवत्सरं उलटली, मुलांचे विवाह झाले, युगांचे काळ लोटले.. आणि तुम्हाला आता हा प्रश्न पडलाय ?..". महादेव म्हणाले “प्रश्न कायमच पडत आलाय त्याची तीव्रता आज जाणवली. कैलासावर गणेशाच्या विवाहाची लगबग असूनही सायंपूजेची वेळ नाही चुकू दिलीस तू. प्रत्येकाची जातीनं विचारपूस केलीस. काय हवं नको ते जबाबदारीने पाहिलंस. ज्याचे त्याचे यथायोग्य मान-पान सांभाळलेस. गणांना नवीन वस्त्रांपासून, थोरल्या सुनांसाठी वस्त्रालंकार निवडलेस. येणाऱ्या सुनांची आवड निवड देखील अगदी हौसेनं सांभाळत होतीस. विवाह सोहळ्यातही नवरदेवाची आई असूनही वधूपक्षा सारखी घाई दिसत होती. मी असा त्रयस्थासारखा उठून फक्त अक्षता टाकायला आलो. ते ही तू बोलावलंस म्हणून. पण तेव्हाही कुठे काही कमी पडू नये म्हणून तुझा पुढाकार होताच, सर्व निर्विघ्नपणे पार पडावं ह्यासाठी तुझी होणारी तगमग क्षणा क्षणाला जाणवत होती. आणि एवढं झाल्या नंतर सर्वात शेवटी अगदी सगळ्यांच्या मागे एका आडोश्याला उभं राहून समाधानाने पाणावलेले तुझे डोळे पाहिले मी पार्वती; आणि मनात एक विचार येऊन गेला; खरंच पार्वती तुला मी सुखी ठेवू शकलोय?..”. ह्यावर पार्वती काहीच बोलली नाही. फक्त हसऱ्या डोळ्यांनी महादेवांकडे केवळ पाहिलं. महादेव पुढे बोलते झाले; “संसाराच्या उत्तरार्धात जेंव्हा पूर्वार्धाच्या सुरुवातीला पडायला हवेत ते प्रश्न नव्याने पडू लागतात तेंव्हा अक्खा जीवनपट डोळ्यासमोर लक्ख उभा राहतो; आयुष्यभर मी असा भणंगा सारखा वागलो. आपला विवाह झाला आहे; आपल्याला मुलं आहेत ह्याचा विचार न करता मी हा असा उघड्यावर संसार थाटला. तुम्हालाही ठेवलं. मनात येईल तेंव्हा काशी, गया, प्रयागराज कुठे ही उठून निघून जायचो.. वर्षानुवर्षं घराचं तोंड नाही पाहिलं. कैलासावर हिंस्र श्वापदं होती, अनेक अस्मानी, अमंगल संकटं होती. मुलं लहान होती. तू एकटी होतीस. तुमच्या गाठीशी पुरेसा अन्नसाठा आहे की नाही?. माझ्या मागे तुझा, मुलांचा, ह्या गणांचा सांभाळ तू कसा करत असशील? हा साधा प्रश्न पण नाही कधी कसा पडला मला. जेव्हां परत यायचो तेव्हा हातात औक्षणाचं ताम्हण घेऊन हसत मुखाने तू स्वागत करायचीस. कधी चार सुखाच्या, प्रेमाच्या गोष्टी नाही बोलता आल्या ह्या उभ्या आयुष्यात तुझ्याशी. तुला काय वाटतं?, काय म्हणणं आहे तुझं?, काय प्रश्न आहेत तुझ्या समोर?, काय अडचणी येत आहेत तुला हे जाणून घ्यावं असं नाही वाटलं. जगताने “हर हर महादेव..” म्हंटलं की भोळ्या मनाने धावून गेलो मी; पण महादेवी घरी काय झुंज देतेय हे त्या थोरपणाच्या धुंदीत जाणून घ्यायचंच राहून गेलं. तू देखील हे सगळं आजवर बिना तक्रार सहन केलंस. कार्तिकेय तुला सोडून दक्षिणेत निघून गेला. तेव्हा तुझ्या ममतेची भूक भागवण्यासाठी तू गणेशाची निर्मिती केलीस. मी त्याचा शिरच्छेद केला. तेव्हाचं तुझं रौद्ररूप आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. एक आई म्हणून तुझ्या भावना तीव्रतेने समोर आल्या पार्वती; पण पत्नी म्हणून तुझ्या तक्रारी कधी माझ्यापर्यंत आल्याच नाहीत. त्या तू मनातच दाबून टाकल्यास. का? मी समजून घेणार नाही असं वाटलं की मला त्रास होऊ नये म्हणून नाही येऊ दिल्यास?; माहीत नाही पण आज तू मनमोकळेपणाने बोलावसं असं खूप वाटतंय..” पार्वती महादेवांकडे पाहात हे सगळं ऐकत मंद हसत होती. महादेवांचं बोलून झालं होतं. पार्वती शांतच होती. तिने त्यांच्या बलदंड खांद्यावर डोकं ठेवलं. 


आणि आकाशातल्या चांदण्यांकडे पाहात शांतपणे काहीवेळ तशीच राहिली. महादेवांनी ही तिला बोलतं केलं नाही. ते ही तसेच तिच्या स्वतःहून बोलण्याची वाट पाहात होते. पार्वती एका क्षणी बोलती झाली; “चंद्र जेव्हा आभाळात चमकतो ना तेव्हा चांदण्यांनी फक्त त्याची शोभा वाढवायची असते; स्वतःच्या अस्तित्वाची चिंता सोडून द्यायची आणि ते नभोमंडळ साजिरं करायचं. आकांक्षांना आणि अपेक्षांना पार नसतो. एका काळानंतर पत्नीची आपसूक आई होत जाते. आणि आईसाठी क्षमा करण्यावाचून पर्याय नसतो. तुम्ही अवतार कार्य संपवू शकलात कारण कैलासावर मी सक्षम होते, आणि मी सक्षम होते कारण धर्मकार्यात तुम्ही कार्यक्षम राहिलात.एवढंच त्यामागचं उत्तर!. राहता राहिला प्रश्न विनायकाच्या शिरच्छेदाचा.. तर तुमची पत्नी पार्वती म्हणून त्याचं गजमुख मी त्यावेळी मान्य केलं; पण आई म्हणून आजही मी समाधानी नाहीये. आपलं मूल कुठेही उणं दिसता नये ह्यावर मी आजही ठाम आहे. पण नशिबाच्या पुढे परमेश्वर ही नसतो.". महादेवांना पार्वतीचं बोलणं जिव्हारी लागतं. ते तिच्याकडे पाहतात. पार्वती त्यांच्या खांद्यावरनं डोकं न काढता तशीच पुढे बोलत जाते; "कमतरता प्रत्येक संसारात असते. तुमच्या शब्दात सांगायचं तर उत्तरार्धाच्या ह्या टप्प्यावर येऊन जर झालेल्या घटनांची गणितं मांडली तर ओठी हसू आलं तर ते सुख मानायचं, आणि डोळ्यात अश्रू आले तर झालं गेलं सोडून देऊन समाधान.,". एवढं बोलून पार्वती शिळेवरून उठली. जाता जाता म्हणाली; "विनायक रिद्धी सिद्धीला घेऊन गणेश लोकात जाणार आहे.. त्यांच्या निघण्याची तैयारी करायची आहे.. मुलांना निघायच्या आधी पुढल्या संसारासाठी आशिर्वाद लागतील आपले.. येताय ना?". महादेव होकारार्थी मान हलवतात. पार्वती एवढं बोलून पूजेचं ताम्हण घेऊन निघून जाते. महादेवांना कळून चुकलं की पार्वतीने मोठ्या हुशारीने सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन ही टाळली आहेत.

✍🏻अजिंक्य ठाकूर



Comments

Popular posts from this blog

आम्ही ना मराठी माध्यम वाले..