आम्ही ना मराठी माध्यम वाले..


आम्ही ना मराठी माध्यम वाले..

बे एके बे, पाच त्रिक पंधरा वाले.. 

'या कुंदेंदुतुषारहारधवला' आणि 'एक साथ नमस्ते' वाले.. 

'भारत माझा देश आहे' आणि 'सारे भारतीय माझे बांधव' वाले.. 

आम्ही हातचा धरणारे आणि बाकी सोडणारे.. 

क, ख, ग, घ पासून य, ज्ञ आणि अं,अ: वाले.. 

अल्जेब्रा अँड जॉमेट्री नाही; बीजगणित आणि भूमिती वाले.. 

बालवाडी ते दहावीच्या एसएससी बोर्ड वाले..


आम्ही टि. म. वि. च्या इंग्रजी आणि गणिताची प्रशस्तीपत्रक मिरवणारे..

हिंदी, मराठी आणि मोडक्या तोडक्या इंग्रजीत का असेना वक्तृत्व स्पर्धेची बक्षीसं मिळवणारे..  

आम्ही परिसर आणि नागरिक शास्त्र वाले.. 

आम्ही गोट्या, श्यामची आई आणि फास्टर फेणेवाले.. 

आम्हीच चंपक, ठकठक आणि चांदोबा वाचणारे.. 

'सातच्या बातम्या' आणि नंतर 'वादळवाट' पहाणारे.. 

आम्ही प्लेलिस्ट मध्ये Eminem आणि रेहमान शेजारी वसंतराव आणि अभिषेकी ठेवणारे..

आम्ही मंटो आणि गालिब वाचताना ही पुलं आणि कुसुमाग्रज काळजात जपणारे..

लगोरी, आबादुबी, लंगडी आणि पाच तीन दोन वाले..

आम्ही 'स्मशानातील सोनं' आणि 'अंतू बर्वा' वाले..

आम्ही ना मराठी माध्यम वाले.. 


आम्ही स्टीफन किंग इतकेच मतकरींच्या कथेने शहारणारे..

आम्ही बुकोस्की पेक्षा ग्रेस ला मिठी मारणारे..

आम्ही पास्ता पेक्षा आई च्या हातच्या पोह्यात रमणारे...

आम्ही कुब्रिक, कश्यप सोबत दादा कोंडके आणि कोठारे बघणारे..

आम्ही मार्वल पेक्षा नायक आणि चिंटू च्या प्रेमात..

'जडतो तो जीव..' आणि 'थोडी सागर निळाई..' ही सिरियल ची गाणी आमच्या मनात..

आम्ही गणपतीच्या आरतीला हमखास 'फळीवर वंदना' आणि 'संकष्टी पावावे' वाले..

होय आम्ही मराठी माध्यम वाले.. 


आमचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला ब्रो ची भाषा नाही कळत; आम्हाला ‘ए भावा’ ऐकू येतं.. 

मिस् च्या जागी बाई, आणि सिस् च्या जागी ताई समजतं..

रात्री निजताना मॉमच्या हग ऐवजी आम्हाला आईची कूस लागते..

आजही अंगाईत लिंबोणीच्या झाडामागे चंद्राचीच वर्णी लागते..  

'फक' ची भाषा कळतच नाही आम्हाला.. 

'भोसड्यात जा..' म्हटल्या शिवाय जमतच नाही आपल्याला..

आमच्यात अर्बन आणि रुरल नाही; शहरी आणि गाववाले.. 

होय आम्ही मराठी माध्यमवाले

@अजिंक्य ठाकूर


Comments

Popular posts from this blog

तू सांब भोळा; उमा पार्वती मी..