म.. मराठी, मी.. मराठी
तुझ्या शब्दगंधात मोहरावे कळ्यानीं
नेसल्या लावण्यवती भरजरी दुशाली
तुझ्या अमृते पाझरे ज्ञानगंगेचा घडा
तू स्वधर्म राखिण्या पेटविल्या मशाली
तू तुकोबाच्या जणु अभंगातून हासली
अन दासबोधातल्या पंक्तित मिसळली
ज्ञानेश्वरी झालीस कधी अश्लाघ्य बोली
जणु अमृताच्या पैजा जिंकण्या मिळाली
आईच्या अंगाईत तुझा सायस्पर्ष जाणवे
सखीचे पहिले प्रेमपत्र रात्र अजूनी जागवे
बडबड गीतात तुला पहिल्यांदा भेटलो मी
नंतर आयबहिणीच्या शिव्यांमध्ये पाहिली
तू फक्त भाषाच नाहीस, तू एक संस्कार आहेस
शब्द सरस्वतीच्या गळ्यातला अलंकार आहेस
तुझ्या पोटी जन्मलो हे मला लाभले भाग्य मोठे
'मराठी' तुझी पुण्यपालखी अगा आजन्म घेतली
©अजिंक्य ठाकूर


Comments
Post a Comment