जणू अंगी श्यामल शेला..


काहीतरी विलक्षण आहे ह्या नावामध्ये; ह्या व्यक्तिमत्वाकडे मी देव ह्या संकल्पनेतून कधी पाहूच शकलो नाही; मी कायम कृष्णाला माणूस म्हणून पहात आलोय. कारण देवावर श्रद्धा असते आणि माणसाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता. मी ठामपणे ह्या मताचा आहे 'जिथे श्रद्धा असते; तिथे किंतु परंतु नसतात.. जिथे उत्सुकता असते तिथे उलट सुलट प्रश्नांना, शंका कुशंकांना वाव असतो.. ‘, हा कृष्ण कायम मला बुचकळ्यात पाडत आला आहे. त्याच्या बद्दल मला हजार प्रश्न पडतात; त्यामुळे त्याच्यावर श्रद्धा आहे असं नाही मी ठामपणे म्हणू शकत. पण काहीतरी आहे ह्या व्यक्तिमत्वामध्ये एवढं नक्की; काहीतरी प्रचंड आकर्षित करणारं, विचारांवर गारुड घालणारं!!.. 

तान्हेपणी देवकी वसुदेवापासून वेगळा झालेला कृष्ण, नंदा घरी वाढलेला कृष्ण, गोपिकांसमवेत रमलेला कृष्ण, राधेच्या प्रेमात पडून तिच्यासाठी आयुष्यातली एक अतिमहत्वाची जागा तेवढ्याच निष्ठेने रिकामी ठेवणारा कृष्ण, रुक्मिणीचं प्रेम स्वीकारून अमरावतीशी वैर घेणारा कृष्ण, जामवंती, सत्यभामेसाठी त्यांचा त्यांचा म्हणून असलेला हक्काचा कृष्ण, सुदाम्यासाठी सन्मित्राचं उदाहरण प्रस्थापित करणारा कृष्ण, द्रौपदीची लाज राखत स्त्रीवादाला महत्व देणारा कृष्ण, आपण हरतोय हे पाहून युद्धाच्या नियमांना सरळ फाट्यावर मारून पाठ दाखवून पाळणारा रणछोडदास कृष्ण, सोळा सहस्र बायकांशी लग्न करूनही योगेश्वर राहिलेला कृष्ण, महाभारतात पांडव धार्जिणा, हातात सुदर्शन न घेता आपल्या मनाप्रमाणे युद्धाची रचना करणारा कृष्ण खरा, की युधिष्ठिराला पहिल्यांदा खोट्यावर भर दे म्हणणारा राजकारणी कृष्ण खरा?.. 

नंद यशोदेसाठी एक मुलगा म्हणून, द्रौपदीसाठी एक सखा म्हणून, सुभद्रेसाठी एक भाऊ म्हणून, अर्जुनासाठी गुरु म्हणून, रुक्मिणीसाठी नवरा म्हणून, राधेसाठी प्रियकर म्हणून कृष्ण अनेक ठिकाणी चुकला काही ठिकाणी बरोबर ही होता; पण तो मान पचवण्याची आणि झालेला अपमान गिळण्याची जी कला कृष्णाकडे आहे ती इतिहासातलं कुठलंच व्यक्तिचित्र शिकवू शकत नाही. जेवढ्या हसत हसत कुंतीचं, देवकीचं, यशोदेचं प्रेम आणि माया स्वीकारली कृष्णाने, तेवढ्याच तन्मयतेने गांधारीच्या शापाला हसतमुखाने सामोरा गेलेला सुद्धा कृष्णच होता. हे पाहून खरंच हेवा वाटतो यार कृष्णाचा. आपल्या पोटच्या मुलासोबत; सांब सोबत वैरत्व खेळावं लागलं कृष्णाला.. माणूस; माणूस म्हणून असण्याचं दुसरं उदाहरण वेगळं काय असणारेय?. माणूस एकाच वेळी सगळ्यांना खुश कधीच करू शकत नाही; त्याला ते जमत ही नाही. हे कृष्णाकडे पाहून कळतं. द्वारकाधीश, यादवांचा प्रणेता, सोळा सहस्र बायकांचा धनी शिवाय एवढी वंशावळ तरीही हा इहलोक सोडण्याची जागा कुठली तर एकांतात!. कारण काय? तर अंगठ्याला बाण लागतो!!. वाह!!.. ह्यासाठी तर प्रेमात आहे मी ह्या माणसाच्या..

माणसाने कितीही माया जमवली, इमले बांधले, हा माझा तो परका, ही पण पाहिजे, ते पण पाहिजे केलं तरी मृत्युकाळी "इदं न मम" हीच योगीवृत्ती अंगीकारावी लागते हे कृष्णाने ठसठशीतपणे दाखवून दिलं. HATSS OFFF आहे यार ह्या माणसाला..  

कुठलंही राजकारण वैयक्तिक पातळीवर येऊन खेळणारा कृष्ण; चेहरा हसत ठेवून मान मारून जाण्याची कला शिकवणारा कृष्ण, शुन्यातून सर्वस्व उभं करण्याची कला साधणारा कृष्ण, प्रेमाला आणि राजकारणाला अति महत्व देणारा कृष्ण खूप वेगळा आहे.. समर्थांनी जरी राघवाचा प्रचार आणि प्रसार केला तरी त्यांच्या पत्रांमध्ये राजकारणाचं बाळकडू हे कृष्णाकडूनच घेतलेलं दिसतं. कृष्ण व्यक्ती नव्हताच कृष्ण प्रवृत्ती होता. ज्याला जसा जसा कृष्ण कळला त्याने तसा तसा कृष्ण स्वतः मध्ये सामावला.. मला कितपत कळला माहीत नाही; पण जोवर मनात शिष्यवृत्ती आहे तोवर कृष्ण कायम हृदयाच्या जवळ आणि बुद्धीवर आरूढ राहील..

- अजिंक्य ठाकूर



Comments

Popular posts from this blog

तू सांब भोळा; उमा पार्वती मी..

आम्ही ना मराठी माध्यम वाले..