अंबर से आई है परियों की रानी..

 

कोणी मला तुझी सर्वात आवडती हिरोईन कोण असं विचारलं तर आता माझी उत्तरं तापसी, अनुष्का, साई पल्लवी, समॅन्था वगैरे असतील पण मला गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन वगैरे उत्तर द्यायला सांगितलं तर मनात कुठल्यातरी कोपऱ्यात एक उत्तर आहे जे मला माहित्ये माझं पहिलं क्रश "करिष्मा कपूर" आणि ती ही "राजा हिंदुस्तानी" मधली.

आज इंस्टाग्रामवरची करिष्माची पोस्ट वाचली 'राजा हिंदुस्तानी' ला २५ वर्ष झाली. त्यासाठी तिने ती पोस्ट लिहिलीये त्यातलं गाणं ही शेअर केलंय. 

आईशप्पथ बाई त्या फिल्म मधल्या प्रत्येक गाण्यात ज्या दिसल्या आहेत त्यासाठी फक्त आणि फक्त एकाच शब्दात त्याचं वर्णन करता येईल "अद्वितीय"!!. धर्मेश दर्शनची फिल्म होती राजा हिंदुस्तानी. तसं पाहिलं तर गोष्ट अगदी सरधोपट होती. अगदी नेहमीच्या साच्यातली. पण माझं लक्ष आणि माझी नज़र त्या काळात आणि आजही त्या सिनेमात कुणावर स्थिरावलेली असेल तर ती केवळ नं केवळ करिष्मावर.  

बाईंच्या अभिनयाला बऱ्याच मर्यादा होत्या.. आहेत. पण तो निराळा भाग. पण माझ्यासाठी त्या सिनेमातला तिचा वावर हा जादुई आणि स्वर्गस्थ अप्सरेसारखा होता. 

 

कधी कधी एखाद्या व्यक्तीचं एखाद्या प्रसंगी दिसणं, त्याची एखादी लकब आपल्याला नकळत आवडून जाते. आणि त्या व्यक्तीची ती आठवण, ती लकब, ते दिसणं आजन्म आपल्या डोळ्यांसमोर जसंच्या तसं रहातं. त्या प्रसंगाला आपल्या लेखी, आपल्या पुरतं आपण चिरंजीव बनवून टाकतो. तसं काहीसं ह्या फिल्मच्या प्रत्येक गाण्याच्या बाबतीत स्पेशली फक्त बाईंसाठी माझं आहे. आजही माझ्या मनाला, माझ्या डोळ्यांना असीम सौंदर्याच्या बाबतीत त्या गाण्यातल्या त्या चेहऱ्याची रिप्लेसमेंट मिळाली नाहीये. त्या फिल्म मध्ये 'कितना प्यारा तुझे' हे गाणं आहे. त्यात दिवसाचा बागेतला आणि रात्रीचा मंदिरातला मोंटाज आहे त्यात ४-५ करिष्मा कपूर आमीर खानला दिसत राहातात. आणि तो कुणाला पाहू, कुणाशी बोलू म्हणून गोंधळतो. त्याची ती अवस्था आणि ६ वर्ष वय असलेल्या माझी अवस्था डिट्टो सेम होती आणि आजही आहे. ते गाणं फ्रेम बाय फ्रेम मला आठवतं. यू ट्यूबमुळे ते गाणं पटकन अव्हेलेबलही आहे. पण त्या ६ वर्ष वयाच्या असलेल्या माझी ती आठवण, करिष्माचे ते एक्स्प्रेशन गेली २५ वर्ष जसेच्या तसे मला आजही आठवतात एवढं त्या गाण्यांचं गारुड आहे माझ्यावर. एखाद्याच्या मनावर २५ वर्ष नकळतपणे राज्य करणं हे त्या गाण्याचं, संगीताचं, गीत लेखनाचं, दिग्दर्शनाचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या कलाकाराचं यश आहे.

करिष्माच्या वैयक्तीक आयुष्यात बरीच स्थित्यंतरं आली. आज ती पूर्वीसारखं काम करत नाही. पण माझ्यालेखी कायम करिष्माची ओळख आणि माझ्यासाठी तिची पहिली फ्रेम ही राजा हिंदुस्तानीमधलीच असेल. 

माझ्यासाठी त्या जादुई २५ वर्षांसाठी एवढेच शब्द आहेत..    

"अम्बर से आई है परियों की रानी 

देख जिसे होती है सबको हैरानी 

सुन्दर सा मुखड़ा है फूलों के जैसा

होगा ना दुनिया में कोई ऐसा"


@अजिंक्य ठाकुर


Comments

Popular posts from this blog

तू सांब भोळा; उमा पार्वती मी..

आम्ही ना मराठी माध्यम वाले..